Saturday 20 September 2014

१. पत्रास कारण की… गुरुप्रसाद जाधव.

                         या ब्लॉगवरील पहिल्याच समीक्षणासाठी माझा मित्र गुरुप्रसाद जाधवच्या 'पत्रास कारण की…' या ब्लॉगबद्दल लिहिताना मला आनंद होत आहे. पत्र हे संवाद साधण्याचं एक पारंपारिक माध्यम. किंबहुना प्रभावी माध्यम. बदलत्या काळाबरोबर माध्यमं बदलली. जग जवळ आलं. संवाद साधण्यासाठी एकाहून एक सोयीस्कर माध्यमांचा मानवानं शोध लावला. एका क्षणात जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीशी संवाद आता आपण साधू शकतो. परंतु इतकं सारं असूनही संवाद मात्र खुंटला. एक प्रकारचा आत्मकेंद्रीपणा माणसात आला. आज संवाद साधण्याच्या इतक्या सोयीसुविधा असूनही आपण कित्येकदा संवाद साधण्याचे कटाक्षाने टाळतो.
                         पत्रातून केला जाणारा संवाद हा ' प्रेषकाच्या मनाचा प्रतिच्या मनाशी होणारा' असा संवाद असतो. एखाद्याला पत्र लिहिताना आपल्या मनातल्या भावनांपासून ते त्याच्या मनातल्या विचारांपर्यंत संभाषण घडत असतं. म्हणूनच पत्र लिहिताना आपल्याला, समोरची व्यक्ती ही जणू आपल्या समोरच बसून आपल्याशी बोलत असावी असा प्रत्यय येत असतो. मग अशा वेळी पत्र लिहिताना आपले संवाद आणखी जिवंत होतात. त्यात कृत्रिमपणा बिलकुल नसतो. त्यामुळेच वाचणाऱ्याच्या मनात सुद्धा ती भाषा, ते शब्द यांविषयी नकळत आपुलकी  निर्माण होते अन् त्यालाही पत्र लिहिणारी व्यक्ती ही अगदी त्याच्या समोर बसून त्याच्याशी बोलत असावी असा आभास होतो. कारण पत्राचा मजकूर लिहिताना आपल्या लेखणीतली फक्त शाईच नाही तर आपलं मन कागदावर सांडत असतं. 

                         कवी, पत्रकार, लेखक गुरुप्रसाद जाधव याने 'पत्रास कारण की…' या ब्लॉगअंतर्गत पत्रांद्वारे संवाद साधण्याचा फार कल्पक प्रयोग केला आहे. समकालीन घडामोडींवर संबंधित व्यक्तींशी वैयक्तीकरीत्या संवाद साधण्याचा प्रयत्न पत्रलेखनाद्वारे करण्याची त्याची कल्पना प्रशंसनीय आहे. हा लेखप्रकार पूर्णतः तसा नवीन नाही. विविध वर्तमानपत्रांतून अशा धाटणीची बरीचशी सदरे आपल्या वाचण्यात येतात. परंतु गुरुप्रसाद जाधवने या लेखमालिकेत जी लेखनशैली वापरली आहे तिच्यात मात्र नक्कीच थोडे वेगळेपण आपल्यास जाणवते. आणि हे वेगळेपणच वाचकांना  ही पत्र वाचण्यासाठी आकर्षित करते.


                        दिग्विजय सिंहांना लिहिलेल्या पहिल्या पत्रापासून गुरूच्या या एकतर्फी पत्रव्यवहाराला सुरुवात झाली. त्याच्या ब्लॉगवरच्या पहिल्या पत्रात त्याने दिग्विजय सिंहांशी व्यक्तीशः संवाद साधण्याचा फार छान प्रयत्न केला आहे आणि या प्रयत्नात तो बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचेही आपल्या लगेच लक्षात येईल. या बड्या परंतु नैतिकता ढासळलेल्या नेत्याशी संवाद साधताना जाधवांनी त्याच्या हुद्द्याचा आदर तर राखलाच आहे परंतु त्याच वेळी त्याच्या सभ्यतेशी असुसंगत वागण्याचे दर्शन वाचकांना व्हावे हा छोटासा हेतूही साधला आहे. 
                        या पत्रातून अपेक्षित संवाद साधण्याचा आणि तो साधतानाच आपल्या लेखनशैलीतून अस्पष्ट मत नोंदवण्याचा प्रयोग गुरूने केला आहे. परंतु यात सरळ टीकेपेक्षा खिल्ली उडवण्याचा प्रकार त्याने वापरलेला आहे. पुढील काही पत्रात मात्र त्याने खिल्ली उडवता-उडवता आपलं स्पष्ट मत नोंदविलेले आपल्यास दिसून येईल. असो. पुढचे पुढे. 

                        सनी लिओनला लिहिलेले दुसरे पत्र हे फारच खुमासदार शैलीत लिहिलेले आहे. कल्पकतेचा आणि लेखनशैलीचा सुंदर मिलाफ या पत्रात आपल्याला पाहायला मिळतो. आगामी चित्रपटात सनी लिओन 'लैला लेले' नामक मराठी तरुणीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याबद्दल तिच्या सच्च्या चाह्त्यानं तिच्यासाठी अभिनंदनपर लिहीलेलं हे पत्र आहे. 


                        'क्रिकेटपटू महम्मद कैफ' याच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दल प्रांजळपणे मत नोंदविणारे गुरुचे तिसरे पत्र आहे. या पत्रातला संवाद अगोदरच्या दोन पत्रांपेक्षा जास्त खरा वाटतो. एका क्रिकेटपटूला पत्र लिहिणारा हा फक्त सामान्य चाहता नाही तर तो एक चाहता पत्रकार आहे. एका माजी क्रिकेटपटूच्या राजकारण प्रवेशाबद्दल तो फक्त बोलतच नाही तर त्या घटनेचं समर्पक विश्लेषण तो करू पाहतो. 'काँग्रेस मधून जरी नरेंद्र मोदी उभे राहिले, तरी ते शंभर टक्के पडतील' अशी समकालीन राजकीय अवस्थेबद्दलची त्याची टिप्पणी आणि 'फुलपूर' मतदारसंघाविषयीची एकूण माहिती यावरून जाधवांच्या लिखाणामागचा पत्रकार ठळकपणे आपल्यासमोर येतो. 


                         'परप्रांतीय भावड्यांना पत्र' हे चौथे पत्र स्वानुभवावरून लिहिलेले आहे. त्या पत्रातील वास्तविक प्रसंगातून ते लक्षात येते. 'माजुरड्या परप्रांतीयांना' आणि 'खरं तर बीप बीप अशीच सुरुवात करणार होतो' यांसारख्या शब्दोल्लेखांतून परप्रांतीयांबद्दलची लेखकाची मनस्वी चीड दिसून येते. पण ही चीड येण्यामागची कारणं देखील लेखक इथे सरळपणे कबूल करतो. ही कबुली  या पत्रात वाचण्यासारखी आहे. 


                          पूनम पांडेला लिहीलेल्या सहाव्या पत्रातील 'एका महिला पत्रकाराने पूनमला विचारलेला महिला सबलीकरणाचा प्रश्न' आणि त्यावरील लेखकाचं मत वाचण्यासारखं आहे. 


                          नव्याने संसार थाटणाऱ्या लोकशाही आज्जीस लिहिलेल्या पत्रातल्या कल्पकतेबद्दल, त्यातल्या आशयाबद्दल लेखकाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावसं वाटतं. या सहाव्या पत्रापासून लेखकाच्या लिहीण्याचा कल हा विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक स्पष्ट मत मांडण्याकडे वळला आहे. परंतु तो वळताना मूळच्या लेखनशैलीत फारसा फरक मात्र पडलेला नाही, हे नक्कीच कौतुकास्पद. 


                           'साहेबांना' लिहीलेलं आठवं पत्र हे त्यावरच्या टीका व प्रशंसेमुळे सर्वात गाजलेलं पत्र असं आपल्याला म्हणता येईल. या पत्रात संवादाच्या सीमा ओलांडून वर्तमानातील लोकांच्या बोथट झालेल्या जाणीवांचं आणि बाष्कळ राजकीय भूमिकांचं समर्थन न करता एका पत्रकाराने निर्भीडपणे मांडलेलं मत आहे. 


                           नवव्या पत्रात 'मोहसीन शेख' या मुस्लिम तरुणाच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करत, त्याच मयत बांधवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आणि झाल्या प्रकाराबद्दल, जातीयवादाबद्दल आणि धर्मांध प्रवृत्तींबद्दल लिहीत लेखक मनापासून व्यक्त होतो. यात लोकांच्या निष्क्रियतेवरचा लेखकाचा राग आणि कोडगेपणाची भावना सच्ची आहे. 


                           त्यानंतरच्या दहाव्या पत्रात गुरूने फारच जहालपणे भारतरत्न लता मंगेशकरांच्या कँपाकोलावासियांबद्दल केलेल्या ट्विटवरती मत मांडले आहे; नपेक्षा लता मंगेशकरांना निर्भीडपणे प्रश्न विचारले आहेत. हे पत्र तरी 'प्रति'च्या वाचण्यात यायला हवे होते, असे मला नेहमीच वाटत आले आहे. गुरुचे हे पत्र मला सर्वात जास्त भावलेले पत्र आहे. "माणसं वाटतात तशी ती नसतात, शेवटी ती माणसंच  असतात…" हे त्याच्या सबंध लेखमालेतील मला सर्वात जास्त आवडलेलं वाक्य देखील याच पत्रामधलं. 


                           पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री रेखा आणि आमिर खानला लिहीलेल्या पत्रांत बऱ्यापैकी साम्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. या तीनही पत्रांमधला मजकूर हा लेखकाच्या पहिल्या पत्राची आठवण करून देतो. आशयातील या साम्याला कदाचित लेखकाला ज्याला पत्र लिहावसं वाटलं त्या व्यक्तीची, पर्यायानं विषयाची निवड हे कारण असू शकतं. 


                           वर्तमानातील घडामोडींवर लिहीणारे बरेच असतात. आहेत. भाष्य करणारे तर सगळेच आहेत. पण कित्येकदा या बोलण्यापाठी, व्यक्त होण्यापाठी गरजेचा असलेला विचार प्रत्येक जण करतोच, असे मात्र नाही. शिवाय एखाद्या घटनेबाबत, व्यक्तीच्या वागणुकीबाबत बोलणं वेगळं आणि त्याच्याशी व्यक्तीशः संवाद साधून त्यातल्या चुका दाखून देणं वेगळं. प्रस्तुत लेखकाचं हे वेगळेपण आपल्याला मान्य करायला हवं. हा संवाद एकतर्फी असतो. किंबहुना ही पत्र त्याच्या प्रतिंपर्यंत पोहोचतही नाहीत परंतु कदाचित या पत्रांवरील 'पत्ता' हा आपला असावा असं मला वाटतं. आता ही पत्र वाचावी की तशीच पेटीत असू द्यावीत हे मात्र आपलं आपण ठरवायचं आहे. जसं लेखक म्हणतो, "जमलं तर वाचा…" http://pattraskarankee.blogspot.com